अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या तज्ज्ञ अभ्यास समिती मंडळावर अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड झाली आहे. डॉ.इंगोले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही नोंदणीकृत डॉक्टरांसाठीची सरकार नियुक्त समिती आहे. या समितीद्वारे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सला अधिकृत मान्यता देणे तसेच दवाखाने व वैद्यकीय आस्थापना यांना मान्यता देणे किंवा नाही देणे याविषयी ही समिती कार्य करते. महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय आस्थापनांवर महाराष्ट्र शासन या समितीद्वारे नियंत्रण ठेवते. वैद्यकीय उपचार करताना डॉक्टर व रूग्णालयाद्वारे योग्य प्रकारचा उपचार झाला आहे किंवा नाही, यामध्ये कुठे निष्काळजीपणा झाला आहे का..? याच्या पडताळणी करिता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची राज्य सरकार द्वारा नियुक्त ही समिती असते. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध डॉक्टर्स व रूग्णालयांद्वारे झालेल्या मेडिकल निगलिजन्स केसेस या समितीद्वारे योग्य आहेत किंवा नाहीत याविषयी निर्णय घेतला जातो. त्यानुसार शासन गुन्ह्याचे स्वरूप ठरवून त्यावर डॉक्टर्स किंवा रुग्णालय प्रशासनावर कार्यवाही करते. घटनात्मकरित्या ही समिती अत्यंत जबाबदारीची व महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या समितीवर अंबाजोगाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची निवड झाली आहे ही तमाम अंबाजोगाईकरांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची गोष्ट आहे असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ.इंगोले यांचे मनोविकृतीशास्त्रातील आतापर्यंतचे योगदान, सामाजिक कार्यातील सहभाग व विविध शासकीय समित्यांवर विविध पदावर कार्य केल्याची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या मेडिकल निगलिजन्स केसेसच्या स्क्रुटिनायझिंग कमिटीवर केली आहे. डॉ.इंगोले हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात ते उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अंबाजोगाईतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील विविध मित्र मंडळींनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.