अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
शहरातील क्रांतीनगर परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकत चौघांना रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे 2 लाख 94 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास दत्ता काटे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण बेकायदेशीररीत्या तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी विजय शामराव रेडे (वय 43, रा. माऊली नगर), ठकेश नारायण शेळके (वय 35, रा. कावळेचीवाडी ता. परळी), नरसिंग दशरथ खाडप (वय 40, रा. साईनाथनगर) आणि बाबासाहेब शशिकांत सोनकांबळे (वय 45, रा. भिमनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, पत्त्यांचे संच, तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याशिवाय जुगाराच्या डावावर लावलेल्या चार मोटारसायकलींचाही समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 2,94,650 रुपये इतकी आहे.
ही कारवाई फिर्यादी पोलीस कर्मचारी तेजेश वाहुळे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून गुन्हा क्रमांक 107/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी गायकवाड करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
