0
अँटिगा – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच घरात पराभूत केले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५६६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४३ धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे फॉलो ऑन घेऊन पुन्हा मैदानात उतरलेल्या विंडिजचा दुसरा डावही २३१ धावांवर आटोपला.
टीम इंडियाने अँटिगा कसोटी जिंकून वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयी सलामी दिली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनटीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. ८३ धावांच्या मोबदल्यात अश्विनने सात विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.
चौथ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजने दोन बाद ७६ धावांची मजल मारली होती. पण उपाहारानंतर अश्विनने प्रभावी मारा करुन वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडल्यामुळे विंडीजची आठ बाद १३२ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग कार्लोस ब्रॅथवेट आणि देवेंद्र बिशूने नवव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने बिशूला माघारी धाडून ही जोडगोळी फोडली आणि विंडीजचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला.

Post a Comment

 
Top