0

# कारेगाव आदिवासी आश्रमशाळा समस्येच्या गर्तेत
# मागील चार वर्षांपासून स्त्री व पुरुष अधीक्षक पदे रिक्त

शहापूर - ( प्रतिनिधी ) -     शहापूर व मोखाडा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , जव्हार यांच्या अधिपत्याखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या कारेगाव आदिवासी आश्रमशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे उघड झाले , विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या हेळसांड बाबत  उत्तर देण्यास देखील कारेगाव आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना प्रकल्प अधिकारी , जव्हार यांनी मनाई  केल्याने येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिले आहे .
        आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या या आश्रमशाळेची प्रचंड दुरावस्था झालेली आहे . उंच ठिकाणी असलेल्या या शाळेला वरती येण्यासाठी असलेला रस्ता हा संपूर्णपणे उखडलेला आहे . शाळेच्या दर्शनी भागात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाट्यांची दुरावस्था झाली आहे .  शाळेतील एकही वर्गखोल्यांमध्ये पंखे नसून पत्र्यांचे शेड व कौलं असलेल्या वर्गांमध्ये गरमीने विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे . विद्यार्थ्यांना बसण्यास बेंच नसल्याने खाली मळकटलेल्या गरम लाद्यांवर
बसून वार्षिक परीक्षेचे पेपर सोडावे लागत आहे . मुख्यतः जंगलात असलेल्या या आश्रमशाळेला  मुलींच्या सुरक्षितेसाठी महत्वाचे असलेले स्त्री अधीक्षक व मुलांच्या सुरक्षितेसाठी असलेले पुरुष अधीक्षक हे पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघड झाली .  येथील वर्गखोल्यानां असलेल्या खिडक्यांना केवळ 1 लाकडी फलाट असल्याने दुसरी खिडकीची  बाजू उघडीच राहत असल्याने रात्रीच्या वेळेस साप , विंचू सारखे प्राणी खोलीत येऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो .
         येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेत असलेल्या समस्यांबाबत प्रतिनिधीने विचारले असता आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या प्रकल्प अधिकारी परणीत कौर यांनी आम्हाला प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास अथवा माहिती देण्यास मनाई केल्याचे सांगत , शाळेसंबंधी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली . याबाबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याशी संपर्क साधला असता ते विधिमंडळात असल्याचे त्यांच्या स्वीय साहाय्यकानी सांगितले .( प्रतिनिधी - जी.बी.गायकवाड ) 

Post a Comment

 
Top