0


    माहूर ( प्रतिनिधी ) -    दि.२ एप्रिल माहूर येथे श्री रेणुकादेवी संस्थानवर गान सम्राज्ञी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भक्तीगीत, प्रेमगीत, फिल्मी गीत, देशभक्तीपर गीतासह अनेक सरस गाणे  गायन केल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात संगीत मेजवानी मिळाल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. चैत्र नवरात्र निमित्य माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान येथे आज गान सम्राज्ञी अनुराधा पौडवाल यांनी आपली गायन, संगीत सेवा श्री रेणुकामातेच्या चरणी अपर्ण केली. पद्मश्री पुरस्कार मिळाल्या निमित्य त्यांची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकामातेच्या चरणी आपली गायन, संगीत सेवा अर्पण करण्यासाठी त्या माहूरात आल्या होत्या. प्रथम आई रेणुकामातेचे मनसोक्त दर्शन घेऊन व विश्वस्त समितीने केलेला यथोचित सत्कार स्वीकारून त्यांनी आपल्या गायन संगीत सेवेला प्रारंभ केला.
प्रथम गायत्री मंत्राने सुरुवात करून “माझी रेणुका माउली’’, मन मेरा मंदिर शिव मेरी पुजा, तुने मुझे बुलाया शेरावली ये, महाराज जय स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे भक्ती गीते सादर करून रुपेरी माळ्याच्या मळ्यात ये ना, बंदिनी जन्मोजन्मीची कहाणी, तळव्यावर मेहंदीचा रंग आजुनी ओला, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, मन उधान वाऱ्याचे, आदी प्रेम गीता सह विविध विषयावरील एकापेक्षा एक सरस गाणे सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.  याशिवाय जुन्या आशिकी चित्रपटातील “नजर के सामने जिगर के पास, हे फिल्मी गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली तर “  दिल दिया है, जान भी देंगे”  हे देशभक्तीपर गीत गायन करून आपल्या भावपूर्ण संगीत सेवा रेणुकामातेच्या चरणी अर्पण केली. यावेळी त्यांच्या समवेत सहकारी राजशेखर महामुनी, व त्यांचे चिरंजीव आदित्य पौडवाल यांचे सह त्यांचे सहकारी यांनी ही उत्कृष पणे संगीत रचना सादर केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रा.मार्तंड कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त आशिष जोशी यांनी पार पाडले.
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठापैकी एक ठिकाण असून मागील पन्नास वर्षाच्या काळात याठिकाणी केवळ हेवे दावे व आपसी वैरामुळे या संस्थानची प्रतिमा संपूर्ण भारतात डागाळल्या गेली. अखेर जगन्माता रेणुकेलाच भक्तांची कनव येऊन हिंदुस्थान च्या सर्वोच्च न्यायपीठाने या ठिकाणी भा.प्र.से. अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक प्रशाकीय मंडळ नेमले व तेथूनच या रेणुकादेवी संस्थानच्या विकासाचा पाया रोवला गेला. वर्षभरातच औरंगाबादचे धर्मदाय सह आयुक्त विनोद पाडळकर यांनी वर्षभर सर्व गटातटांच्या सुनावण्या घेतल्यानंतर माहूर रेणुकादेवी संस्थानावर जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक प्रभावशाली विश्वस्त समिती नेमून तीत उपाध्यक्ष म्हणून पदसिद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट, व सचिव म्हणून भा.प्र.से. दर्जाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच कोषाध्यक्ष म्हणून तहसीलदार माहूर तसेच सात विश्वस्तांपैकी पाच ब्राम्हण पुजारी व दोन मराठा वंशपारंपारिक पुजारी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नेमले असून कायम विश्वस्तांबाबत निर्णय लागे पर्यंत कुणीही,कितीही बोटे मोडली तरी हे विश्वस्त मंडळ तोपर्यंत कायम राहणार आहे. संस्थानाने पाच लाखाचे उत्पन्न पाच कोटीवर नेल्याने व सुयोग्य व्यवस्थापन राखल्याने नुकतेच माहूरला भेट दिलेले नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवइ यांनी समाधान व्यक्त करून न्यायिक संस्थेचा अध्यक्ष असलेल्या या समितीची प्रशंसा केली असून त्याचे सर्व श्रेय जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर तसेच सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड  व आज्ञाधारक विश्वस्तांना द्यावे.
    गत दोन वर्षापासून माहूर गडावरील नवरात्र प्रसिद्धी माध्यमातून जगश्रूत झाले असून त्यामुळेच तुळजापूर धर्तीवर चैत्र नवरात्राचा स्तुत्य  उपक्रम राबविला असून नवरात्राप्रमाणेच याही नवरात्रात अनेक नामवंतांनी गडावर हजेरी लावून भाविकांचे कर्णइंद्रिय तृप्त केले आहेत. त्यातील प्रमुख शहनाई वादक पंडीत नितीनजी धुमाळ नाशिककर, प्रख्यात गीत रामायणकार  पंडीत संजय जोशी व पार्श्वगायिका सौ.मानसी संतान यांच्या एकापेक्षा एक सरस संगीत कार्यक्रमांनंतर कळस म्हणजे नुकत्याच पद्मश्री मिळालेल्या गानकोकिळा अनुराधा पौडवाल  यांनी कळस चढवून चैत्र नवरात्र रामनवमीच्या पूर्वसंध्येवर गोड केल्याने भाविकांनी विश्वस्त मंडळाचे आभार मानले आहेत. ( प्रतिनिधी - सर्फराज दोसानी )

Post a Comment

 
Top