0
जिल्हा प्रशासन, पोलीस, मनपा यांची अचानक धाड
कल्याण रेतीबंदर येथे ७२ कोटींची यंत्रसामुग्री जप्त
७६ लाखांचा रेतीसाठाही ताब्यात; अनेकांवर गुन्हे दाखल करणे सुरु

शहापूर ( प्रतिनिधी ) -    कल्याण रेतीबंदर परिसरात काल दुपारनंतर महसूल विभागाने घातलेल्या संयुक्त धाडीत आज दुसऱ्या दिवशी देखील जप्त केलेल्या यंत्रसामुग्री आणि रेतीसाठ्याची मोजदाद करण्याचे काम सुरु असून तब्बल ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली असून त्यातील काही सामुग्री परत वापरात येऊ नये म्हणून कायमची नष्ट करण्याचे काम सुरु होते. अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींची दखल घेऊन काल दुपारी स्वत: जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, ,पोलीस उपायुक्त संजय शिंदे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त ई रविंद्रन यांनी आपल्या पथकांनिशी रेतीबंदर येथे संयुक्त धडक मारली होती. आज पहाटेपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: याठिकाणी थांबून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेऊन होते.
राज्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठीची ही एकाच वेळी संयुक्तरीत्या झालेली पहिलीच मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईत महसूल विभाग, पोलीस, कल्याण डोंबिवली पालिका पथक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या धाडीत सक्रीय सहभाग घेतला होता. यामध्ये ४ उप जिल्हाधिकारी, ७ तहसीलदार, ६ नायब तहसीलदार व  त्यांचे कर्मचारी, तलाठी असे महसूल विभागाचे १५६ अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांचे ६० कर्मचारी, पालिकेचे ४० अधिकारी व कर्मचारी तसेच मेरीटाईम बोर्डाचे २५ कर्मचारी यात दुसऱ्या दिवशी देखील सातत्याने अखंडितपणे काम करीत आहेत.
१३२ हौद नष्ट, ५७६० ब्रास रेतीसाठा जप्त
 अनपेक्षितरीत्या पडलेल्या या धाडीमुळे अवैधरीत्या साठविलेला ५८५१ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ९० लाख आहे. रेतीउत्खननासाठी जप्त केलेली यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली असून काही सामुग्री परत वापरात येऊ नये म्हणून कटर्सच्या सहाय्याने जाळून नष्ट करणे सुरु आहे. स्वत: अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे आणि तहसीलदार यावर लक्ष ठेऊन आहेत.
या मोठ्या कारवाईत १६ ट्रक्स ( ६० लाख), छोटा हत्ती ६ (९ लाख),छोटे टेम्पो २ ( ३ लाख), जीप २ ( ६ लाख), क्रेन्स ३४ ( १२ कोटी ९५ लाख), बार्ज २९ ( ३८ कोटी ८० लाख), बोटी १३ ( ६५ लाख), सक्शन पंप्स ९६ ( ८ कोटी ७३ लाख), बूमट ३३ ( १ कोटी ३२ लाख), बकेट ३९ ( २७ लाख ३० हजार), जाळी २ ( १० हजार), मोटार पंप्स १८ ( ३६ लाख), जनरेटर १ ( २ लाख), ड्रेझर ६ ( ७ कोटी ५० लाख), सिलेंडर१७ ( ८५ हजार) अशी सामुग्री जप्त करण्यात आली आहे.
यावेळी १९ प्लॉटवर ३५ रेतीचे ढीग १३२ हौद आढळून आले आले होते .हे हौद आता तोडण्यात आले आहेत.  सर्व संबंधितांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले असून बाजारपेठ कल्याण येथे पोलीस पंचनामे आणि गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे.
या परिसरात काही छोटे कारखाने आणि तबेले देखील अवैधरित्या आढळले, त्यांच्य्वरही कारवाई सुरु आहे.  
अवैध रेती व्यवसाय पूर्णत: बंद होत नाही तोपर्यंत अशाच स्वरुपाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल यंत्रणा आणि मेरिटाईम बोर्डाला दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 हा परिसर मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येतो त्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आणि पुढे असे प्रकार या भागात घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.( प्रतिनिधी - जी.बी.गायकवाड )

Post a Comment

 
Top