0
दौंड येथे शिवजयंतीनिमित्त “शिवरायांचा आठवावा प्रताप” या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप याचं व्याख्यान

दौंड ( प्रतिनिधी )  - छत्रपती शिवरायांचा काळ स्वराज्यासाठी झपाटलेल्यांचा होता, छत्रपती  शिवरायांनी गनिमी कावा व आरमारी युद्धनीतीच्या बळावर शत्रूला धुळीस मिळवून अवघ्या सत्तावीस वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्य मिळवले. जे शिवरायांनी दिले ते आपण विसरलो. डोंगरी मार्गाने, समुद्रीमाग्रे येणारे दहशतवादी भारतात घुसतात. हल्ले करतात. आपण शिवरायांच्या दुर्गाची आणि समुद्री आरमाराची युद्धनीती विसरलो म्हणून असुरक्षित झालो आहोत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी केले.
दौंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यशिल्पाजवळ शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात ‘शिवरायांचा आठवावा प्रताप” या विषयावर जगताप यांनी विचारपुष्प गुंफले. गनीम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे शत्रूची हालचाल. हे जाणूनच शिवरायांनी औरंगजेबाच्या लाखोंच्या मुघली फौजेशी, तसेच पोर्तुगीज, डच या शत्रूंशी संघर्ष केला. त्यागाच्या बळावर देश उभा राहतो. त्यानुसार स्वराज्यासाठी अनेक निष्टावंतांनी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. गडकोट हे जलस्रोतांचे साठे आहेत. दुष्काळात ठणाणा करणाऱ्या शासनाला गडांवरील जलाशये दिसत नाहीत. शिवरायांनी उभारलेले आरमार तसेच जलदुर्गाची केलेली उभारणी स्वराज्याच्या सुरक्षेसाठी गरजेची होती. शिवरायांनी आपल्या सुनेला ताराराणी यांना शस्रयुद्धनीती शिकवली. शंभूराजांनी शिवरायांचे स्वराज्य दक्षिणेपर्यंत वाढविले. बुंदेल खंडाचे राजे छत्रसाल यांनी शिवरायांचा आदर्श घेतला. आज सह्याद्रीच्या रांगेतील गडकोट दुर्लक्षित ठेवणाऱ्या राजकीय व सामाजिक शिक्षणात सत्ताधाऱ्यांना शिवरायांचा इतिहास टिकवता आला नाही, की इतिहास शिक्षणात आणता आला नाही, अशी टीका जगताप यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते , त्यांचा संघर्ष धार्मिक नव्हे तर राजकीय होता ,मात्र इतिहासकारांनी त्यांचे चित्रण धार्मिक केल्याने विषमतेची दरी काही काळ निर्माण झाली होती मात्र , वाचनामुळे खरा इतिहास लोकांना समजू लागला आणि शिवाजीमहाराज हे धर्माला तोडणारे नाहीत तर धर्माला जोडणारे आहेत हे समजले ,एकीकडे अमेरिका तीनशे वर्षापूर्वीची दगड गोळा करून देशाची स्मारक म्हणून जगाला दाखवते मात्र आमच्या देशातील गड कोट ही आमची खरी-खुरी स्मारके असताना आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष्य करतोय त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे , गडांच्या संवर्धनासाठी शासनाने लक्ष्य देण्याची गरज असल्याचे सुद्धा ते म्हणाले . लोक म्हणतात शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शिवाजीराजांना जन्म देणाऱ्या जिजाउचीच जेथे उदरात हत्या होते , तेथे शिवाजीराजे जन्माला येणारच कसे? असा प्रश्न उपस्थित करीत शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी समाजविघातक प्रवृत्तीवर सुद्धा  घणाघाती हल्ला चढवला सह्याद्रीच्या भूमीवर झालेल्या लढाया, बलिदाने समजून घेतली पाहिजे. ते प्रयत्न अशा शिवजयंती सोहळ्याच्या माध्यमातून होत आहेत.गेली अनेक वर्ष इतिहासकरांनी चुकीचा रंगवलेला संभाजी महाराजांचा इतिहास पुसून आता खराखुरा इतिहास जगासमोर येतोय , १४ मे ला संभाजी महाराजांच्या जन्मभूमीत पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्मोत्सव सोहळा लाखों शंभूभक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्यासाठी सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावे  असे आवाहन सुद्धा त्यांनी  केले. या वेळी उद्घाटक म्हणून दत्ताजी शिणोलीकर , नगरसेवक जीवराज पवार , बाळासाहेब साळुंखे तर अध्यक्ष म्हणून बांधकाम व्यवसायिक चंद्रमोहन सावंत होते यावेळी डॉ.समीर कुलकर्णी , शाम वाघमारे , मनोहर बोडखे, राजेश गायकवाड  आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश खट्टी आभार यांनी मानले. यावेळी दौंड तालुक्यातून हजारो शिवभक्त उपस्थित होते .Post a Comment

 
Top