0
पत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात मंजूर करण्याची एस.एम.देशमुखांची मागणी

मुंबई ( प्रतिनिधी ) -- पत्रकार व माध्यमांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे.वाढते हल्ले रोखण्यासाठी विधिमंडळातील याच अधिवेशनात  पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करावा तसेच पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर ३०७ कलम लावावे  अशी मागणी करतानाच सूर्यवंशी यांच्यासह इतर  पत्रकारांवर  झालेल्या भ्याड हल्ल्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी जाहीर निषेध केला. सरकारने याच अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला नाही तर राज्यातील पत्रकार १ मे महाराष्ट्र दिनी " चलो वर्षा " असे आंदोलन करतील  असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला.
     इंग्रजी  दैनिक डीएनए या वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि झी २४ तास वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर  व दैनिक दिव्य भास्करचे मुंबई प्रतिनिधी विनोद यादव यांना दिलेल्या धमकीचा निषेध करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने काळ्या फिती लावून खारघर येथील उत्सव चौकात निदर्शन करण्यात आली .
      पत्रकारांना निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी त्यांना संरक्षणाची गरज आहे.पत्रकारांसाठी संरक्षण कायदा व्हावा याकरिता २००५ पासून गेली १२ वर्षे सनदशीर मार्गाने राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा याच अधिवेशनात मंजूर केला जाईल असे दोनदा आश्वासन दिले आहे. त्यानुसार याच अधिवेशनात कायदा मंजूर झाला पाहिजे अशी राज्यातील पत्रकारांची एकमुखी मागणी असल्याचे देशमुख म्हणाले
      महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना संरक्षण नसल्यामुळे दर तीन ते चार दिवसांनी पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत .दोन दिवसांपूर्वी सूर्यवंशी यांच्यावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.या घटनेतील आरोपींना अटक झाली असली तरी त्यातील प्रमुख सूत्रधार फरारी आहे,आणि अटकेतील आरोपींवर किरकोळ कलम लावण्यात आले आहे.याची गंभीर दखल घेऊन समितीच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन प्रमुख सुत्रधाराला अटक करावी व ३०७ कलम लावावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
     खारघर येथील उत्सव चौकात पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी निमंत्रक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मंत्रालय-- विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई हिंदी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनोद यादव, टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रसाद काथे, आयबीएन लोकमत वाहिनीचे चंद्रकांत पाटील यांची भाषणे झाली. नवी मुंबई वार्ताहर संघाचे विकास महाडिक, मनोज जालनावाला,ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, विनोद जगदाळे, यांच्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई,रायगड व पुणे जिल्ह्यातील पत्रकार सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top