0
सासवड ( प्रतिनिधी )  - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी ) सुरू केलेली संघर्ष यात्रा उद्या 3  एप्रिलला  पुरंदर  तालुक्यात  येत आहे. 3  एप्रिलला सकाळी पंढरपुरवरून संघर्ष यात्रा इंदापूर मार्गे  येऊन पुरंदर तालुक्यात प्रवेश करणार आहे  आणि तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्षाचा कवाडे गट, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष व एमआयएम या राज्यातील विरोधी पक्षाच्या वतीने २९ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमधून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , शेतकरी कामगार पक्षाचे  नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे आमदार सहभागी झाले आहेत.जेजुरी मार्गे यात्रा सासवड येथे गेल्यावर सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिल्पाजवळ सभा होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिली .

Post a Comment

 
Top