0
मुंबई : सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अबंरनाथ नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काल संध्याकाळपासून नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे बदलापूर स्टेशनच्या रेल्वे रुळावर पाणी भरले आहे. यामुळे बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी फलाटापर्यंत पोहोचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले

मुसळधार पावसामुळे कर्जत/खोपोली ते बदलापूर लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तर या पावसाची फटका महालक्ष्मी एक्सप्रेलाही याचा बसला आहे. बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये  हजारो प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलीस प्रशासनापासून इतर सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

पाणी घुसण्याची शक्यता, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण

महालक्ष्मी एक्सप्रेस ही मुंबईहून कोल्हापूरला जात होती. ही एक्सप्रेस सीएसएमटीहून रात्री 8 वाजून 23 मिनिटांनी निघाली. रात्री 10 वाजल्यापासून ही एक्सप्रेस बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान अडकली. या ट्रेनमध्येही लहान मुले, वयोवृद्ध अनेक जण अडकले आहे. ही ट्रेन तब्बल 12 तासांपासून बदलापूर वांगणीदरम्यान एका नदीच्या जवळच अडकली आहे. त्यातच सतत पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे.

एक्सप्रेसमध्ये साप शिरला

महालक्ष्मी एक्सप्रेस ही उल्हास नदीच्या परिसरात अडकली आहे. त्यामुळे या एक्सप्रेसमध्ये दोन साप शिरल्याची माहितीही प्रवाशांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. तर दुसरीकडे लहान मुलांसह इतर प्रवाशांना पिण्यास पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

प्रवाशांनी खाली उतरु नये, मध्य रेल्वेचे आवाहन

एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करु नये. प्रवाशांसाठी ट्रेन हेच सुरक्षित जागा आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्याच ठिकाणी थांबावे. तसेच रेल्वे कर्मचारी, एनडीआरएफ, पोलीस प्रशासन लवकरच घटनास्थळी दाखल होत आहेत. असे आवाहन मध्य रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य, हेलिकाॅप्टर रवाना

तब्बल 12 तासानंतर एक्सप्रेसमध्ये अडलेल्या लोकांना बचावासाठी एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांच्या बचावासाठी 2 हेलिकॉप्टरही रवाना करण्यात आलं आहे. तसेच बचावकार्यासाठी 8 बोटही रवाना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 1050 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

कल्याण ते कोल्हापूर स्पेशल ट्रेन

तब्बल 12 तास उलटल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. यानंतर आता या प्रवाशांसाठी एका स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कल्याणपासून कोल्हापूरच्या दिशेने  रवाना करण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top