0
पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल (26 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यात याबाबतची घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
    विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही नुकतंच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
        येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत रुपाली चाकणकर?
रुपाली चाकणकर या सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्याशिवाय त्या पुण्यातील खडकवासला विधानसभा महिला अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लेक वाचवा’ अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी महिला अत्याचार विरोधात अनेकदा आंदोलनं केले आहेत. तसेच बचतगटाच्या बचतगटच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्नही केला आहे.

Post a Comment

 
Top