0
नांदेड : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आता ए टीम होत असून पुढच्या विधानसभेत ‘वंचित’चा विरोधी पक्ष नेता पाहायला मिळेल, असं भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी वर्तवलं. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीसांच्या भाकितानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आत्मविश्वास दुणावला असेल.
‘ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटलं, ती काँग्रेस राष्ट्रवादीच बी टीम व्हायला लागली. आणि वंचित बहुजन आघाडी ए टीम व्हायला लागली. आता तुम्ही ही काळजी केली पाहिजे, की मला असं दिसतंय की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल. तो काँग्रेस राष्ट्रवादीचा नसेल.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने एक सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिला आहे. वंचितने काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली आहे. सोबतच राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. यासाठी बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेस आणि वंचितमध्ये बैठक झाली तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी 22 उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या जागा सोडून इतर जागांबाबतच काँग्रेसने बोलावं, असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं आणि अखेर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली.
लोकसभा निवडणुकीत मतांचं झालेलं विभाजन पाहता वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राज्यातील 10 ते 12 जागांवर काँग्रेसचा उमेदवार जेवढ्या फरकाने पराभूत झाला, त्यापेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती. याचाच फटका काँग्रेसला बसला आणि लोकसभेला राज्यात फक्त एक जागा जिंकता आली.
अनिल परबांना मुख्यमंत्र्यांचा सवाल
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेना आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या दाव्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल फडणवीसांनी विचारला. विधानसभेत युती राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राणे भाजपचेच
नारायण राणे हे भाजपचेच आहेत. मात्र त्यांचा पक्ष आमच्यासोबत विलीन करायचा की नाही, एवढाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र अंतिम निर्णय शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच होईल, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. शरद पवार साहेबांनी काळाची पावले ओळखली पाहिजे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Post a Comment

 
Top