0

पुरंदर ( प्रतिनिधी ) -  दुष्काळी भागात लांबून पाणी वाहून आणताना महिला वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी ही खास गाडी बनवली आहे. कमी त्रासात आणि न सांडता  मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आणणारी ही गाडी आता दुष्काळी भागात अनेक वस्त्यांमध्ये वितरीत करण्यात आली. ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, वनराई, ग्रामपंचायत बहिरवाडी, व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बहिरवाडी येथे गरजू व्यक्तींना सदर नीर चक्र देण्यात आले. सदर नीरचक्र हे सध्या प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहेत. पुढच्या टप्प्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या वस्त्यांना हे नीरचक्र देणार असल्याचे तन्वीर इनामदार यांनी सांगितले.
         पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला बहिरवाडी हे ५५० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे. गावामध्ये दारिद्र्यरेषेखालील आणि जमिनी नसलेली कुटुंब आहेत. शेती आणि दुग्धव्यवसाय हे येथील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. गावात रोजगाराचे कायमस्वरूपी साधन नसल्याने लोकांनी रोजगारासाठी वेगवेगळ्या शहरांत स्थलांतर केले आहे. गावात पाणलोटाची कामे झाली नसल्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या या गावातील पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गावात शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. या सगळ्या समस्यांवर उपाययोजना राबवण्याचे काम या संस्थांमार्फत होत आहे.

वनराई मासिकाचे संपादक अमित वाडेकर म्हणाले कि, बहिरवाडी गावाच्या विकासासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘वनराई’तर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य, पाणी अडविणे-मुरविणे, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारा, सलग समपातळी चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, विहिरींचे पुनर्भरण, तसेच वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. पशुधन विकासाच्या दृष्टीने जनावरांचे कृत्रिम रेतन करणे, चारा पिकांखालील क्षेत्र वाढविणे, दुभत्या जनावरांची संख्या वाढविणे इत्यादी बाबींवरदेखील विशेष भर देण्यात येणार आहे. सांडपाण्याचा निचरा, परसबागा तयार करण्याबरोबर वनीकरण, पाणलोट व्यवस्थापनासह शेती व पशुधन विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिरे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.’  बहिरवाडी हा दुर्गम भाग असून येथे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जलद आणि कमी त्रासाच्या वाहतुकीसाठी नीरचक्राचे वाटप केले गेले आहे.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी ताई लोळे, प्रभारी गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, सरपंच हरिभाऊ लोळे, उपसरपंच दशरथ बबन जानकर, रामचंद्र दशरथ भगत, वनराईचे प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, चंद्रकांत इंगुळकर, ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार, अमित वाडेकर, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सातारा अंकुश जाधव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे समाजकार्य विभागप्रमुख डॉ. प्रकाश यादव, आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे सचिव आकाश भगत तसेच ग्रामसेवक नानासाहेब गराड,  आणि अंगणवाडी कार्यकर्त्या अलका ताई वाशीलकर उपस्थित होत्या.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश दिंबळे, यांनी केले, हणमंत क्षीरसागर, पवन चौदारी, ऋतुजा दाभाडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

 
Top