0
सासवड ( प्रतिनिधी ) - कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन नंतर हातावर पोट असलेल्या लोकांचा जगण्यासाठी सर्वाधिक संघर्ष सुरू असल्याचे दिसते. पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे असणाऱ्या शेतमजूर आणि भटक्या जमातीतील लोकांनी आज माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्याकडील अन्नधान्य संपल्यामुळे कालपासून उपासमार होत असल्याचे कळवले. शिवतारे यांनी तात्काळ  नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी, शहरप्रमुख अभिजित जगताप, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, युवासेनेचे सासवड शहराध्यक्ष मिलिंद इनामके, सचिन जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना देऊन अन्नधान्य उपलब्ध केले.

     जवळपास १२५ ते १५० लोकांची वसाहत असलेले हे लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. आंबोडी गावालगत असलेल्या माळरानावर ही वसाहत असून या सर्वांना अन्नधान्य वितरित करताना सोशल डिस्टन्सिंगबाबत सरकारने दिलेल्या निर्देशांचे देखील पालन करण्यात आल्याचे नगरसेवक सचिन भोंगळे यांनी सांगितले. याबाबत बोलताना माजी मंत्री शिवतारे म्हणाले, हातावर पोट असलेल्या लोकांची कसोटी पाहणारा हा काळ आहे. या काळात सर्व सामाजिक संस्था व सक्षम लोकांनी पुढे येऊन अशा गरिबांना मदती करण्याची आवश्यकता आहे. आपापल्या गावात अशा लोकांची काय स्थिती आहे याबाबत ग्रामपंचायती आणि पदाधिकाऱ्यांनीही आढावा घ्यायला हवा. सामाजिक संस्था आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून काही उपाययोजना करता येणे शक्य आहे का ते पाहावे असेही शिवतारे म्हणाले.

 यावेळी स्थानिक रहिवासी श्री. सचिन आहेर म्हणाले, विजय शिवतारे हे संकटकाळात धावून येतात असं आम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांना त्रास देण्याची इच्छा नव्हती पण प्रसंग तसा होता. शिवतारे यांनीही आमचा संपर्क झाल्यानंतर अवघ्या एक तासात आमच्या घरी अन्नधान्य पोच केले. आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.

Post a Comment

 
Top