0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर प्रशासन,तसेच स्वयंसेवी संघटना विविध उपययोजना राबवीत आहेत. जेजुरी शहरात संचारबंदी,नाकेबंदी व नाग्रीकांच्यात जाणीवजागृती बरोबरच जेजुरी पोलिसांनी मानवतेच्या धर्मातून बेघर,निराधार,तसेच परप्रांतीय कुटुंबियांना मदत करीत आदर्श निर्माण केला आहे.                           
     महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दि १७ मार्च पासूनच लॉकडाऊन पाहण्यास मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता प्रशासनाच्या संचारबंदी आणि जेजुरी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सहकार्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळात चांगल्या सहकार्यामुळे एकाही नागरिकावर गुन्हा दाखल झालेला नाही. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पाच फिरती पथके नागरिकांच्यात कोरोना संदर्भात जागृती व नागारीकाना घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत.तसेच जेजुरी व नीरा येथे नाकाबंदी सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी बाहेर येवू नये यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केलेल्या नियोजनामुळे किराणा,भाजीपाला,दुध,फळे,चिकन,मटन,आदी जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन होमडिलिव्हरी उपलब्ध करून दिली आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्र व औद्योगिक क्षेत्र असल्याने येथे बेघर,निराधार व पोटभरण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कुटुंबीय येथेच अडकून पडले आहे, कारखाने,दुकाने बंद असल्याने त्यांना कोठेही रोजगार उपलब्ध नाही.या काळात त्यांची उपासमार होवू नये यासाठी जेजुरी पोलिसांनी पुढाकार घेवून जेजुरी शहरातील बेघर,निराधार तसेच परप्रांतीयांना जेजुरी येथील बंगाळी शाळेत राहण्याची व्यवस्था केली असून देवसंस्थान व उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने यांना दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. गेली चार दिवसात १२६ परप्रांतीयकुटुंबे तसेच स्थानिक गरीब कुटुंबियांना विविध संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. जेजुरी शहरात एक अनाथ ,बेघर नवऱ्याने सोडून दिलेली महिला आपल्या तीन लहान मुलांसहित रहात होती,लॉकडाऊन मुळे हि महिला व तिच्या मुलांची उपासमार होवू लागल्याने पोलिसांनी पुढाकार घेवून आंबळे येथील सार्थक बाल संस्थेमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्था व दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत. पोलिसांचे आरोग्यही चांगले राहावे यासाठी पोलिसांना मास्क,सेनीटायझर आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. जेजुरीकर नागरिकांनी संचारबंदीच्या काळात यापुढे हि सहकार्य करावे, घरमालकांनी भाडेकरूकडे घरभाड्यासाठी तगादा लावू नये असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.


Post a Comment

 
Top