0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या हौतात्म्याला १४१ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने श्रीक्षेत्र जेजुरी येथील पुणे पंढरपूर रस्त्यालगत असणा-या हुतात्मा स्मारकामध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हौतात्म्य दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची ज्योत तेवत ठेवण्याचे काम देश पारतंत्र्यात असताना आदिवासी आणि रामोशी समाजातल्या अनेक क्रांतिकारकांनी केले होते. त्यापैकीच एक असलेल्या हरी मकाजी नाईक यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या सोबत अत्याचारी व जुलमी ब्रिटिश राजवट संपविण्याचा विडा उचलला होता, त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद नीतीचा वापर करून ब्रिटिशांना मदत करणाऱ्या धनदंडग्यांना धडा शिकवला. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना अटक करून भर सोमवती यात्रेदिवशी हजारो भाविकांच्या देखत हरी मकाजी नाईक यांना फासावर लटकावले गेले. रामोशी आणि बंड करण्याचा विचार करणाऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून जुलमी इंग्रज सरकारने ०४ एप्रिल १८७९ रोजी क्रूर शिक्षा दिली होती. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण रहावे म्हणून शासनाने सातारा जिल्ह्यातील कळंबी आणि जेजुरी येथे हुतात्मा स्मारक बांधले आहे.
    हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या कार्याची महती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी जेजुरी नगरपरिषद व हुतात्मा हरी मकाजी नाईक स्मारक समितीच्या वतीने हौतात्म्य दिन साजरा केला जातो.
हुतात्मा स्मारक सुशोभित करून आणि हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ती पूर्तता करून याठिकाणी अभ्यासिका, वाचनालय असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.वीणा हेमंत सोनवणे यांनी सांगितलेसध्या भारत देशावर कोरोना सारखे संकट घोंघावत असताना हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्यासारख्या थोर हुतात्म्यांचे स्मरण ठेऊन एकसंघ भारत देश ही संकल्पना प्रत्येक तरुणांमध्ये रुजली पाहिजे असे मत हुतात्मा हरी मकाजी नाईक स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णाश्री उपाध्ये गुरुजी यांनी व्यक्त केले. उपेक्षित रामोशी समाजातील क्रांतीकाराकांनी केलेल्या देशसेवेचा शासनाने आदर करावा आणि स्मारकाची दुरावस्था होऊ देऊ नये तसेच नूतनीकरणाचे अपूर्ण राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी माऊली खोमणे यांनी केली.स्मारक समितीचे कार्याध्यक्ष माऊलीभाऊ खोमणे यांनी सांगितले.   याप्रसंगी जेजुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कदम, नगरसेवक सुंदर खोमणे, नगरसेविका रुख्मिणी जगताप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

 
Top