0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  संत सोपानकाका भागवत संप्रदायिक मंडळाचे संघटक अध्यक्ष तथा जेष्ठ प्रवचन /कीर्तनकार ह.भ.प.दशरथतात्या जगताप यांच्या दशक्रियेच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जगताप परिवाराने सामाजिक बांधिलकीचा वारसा जोपासत सुमारे ५१ हजार रुपयांचा निधीचा धनादेश  देवसंस्थानच्या अन्नसेवेसाठी मदत म्हणून दिला.तसेच गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने १००किलो तांदूळ देण्यात आला .  पुरंदर तालुका व जेजुरी पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायामध्ये सर्वात जेष्ठ ,कीर्तनकार व प्रवचनकार   ह.भ.प.दशरथतात्या जगताप (वय-८०) यांना मानणारा मोठा वर्ग आहे ,अनेक जणांना व्यसनापासून मुक्त करून त्यांनी भागवत सांप्रदायाच्या प्रवाहात आणले.त्यामुळे अनेकांचे संसार सुखी झाले , तात्यांचे कीर्तन ,प्रवचन,त्यांचे विनम्र बोलणे ,कीर्तनातून प्रबोधन करणे ,आदीमुळे  ,आबालवृद्ध मोठी गर्दी करीत असत.  १३मार्च रोजी त्यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पुत्र व देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप ,माजी नगरसेवक एन .डी. जगताप ,नगरसेविका सविता जगताप ,उद्योजक कैलास जगताप ,पोपट जगताप ,आदी परिवाराने विचार विनिमय करीत दशक्रिया विधीचा अनावश्यक खर्च टाळून देवसंस्थानच्या वतीने सुरू केलेल्या अन्नसेवेसाठी ५१हजारांची मदत देण्याचे ठरवले ,तर स्व.दशरथतात्यांनी स्थापन केलेल्या गुरुदत्त सेवा ट्रष्टच्या वतीने १००किलो तांदूळ देवसंस्थानच्या अन्नसेवेत देण्यात आला .यावेळी आळंदीचे ह.भ.प.पिराजी नेवसे महाराज यांच्या हस्ते जगताप परिवाराने  ही मदत देवसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ,विश्वस्त शिवराज झगडे ,पंकज निकुडे यांचेकडे सुपूर्द केली .


ही तर तात्यांची वारी ,,,,,,,
कीर्तनकार दशरथतात्या जगताप यांचे शिष्य व परमस्नेही ह.भ.प.पिराजी नेवसे महाराज (आळंदी)यांनी  दशक्रिया विधींसाठी थेट आळंदी ते जेजुरी असा पायी प्रवास सुरु केला ,खांद्यावर भागवत धर्माची पताका ,गळ्यात तुळशीची माळ ,कपाळी गोपीचंदाचा टिळा ,आणि मुखी हरी नामाचा गजर करीत सोबतीला एक सहकारी घेऊन चार दिवस पायी प्रवास करून नेवसे महाराज दशक्रिया विधींसाठी जेजुरीत पोहोचले ,याबाबत त्यांना विचारले असता ,स्व.तात्यांनी मला दीक्षा देत वारकरी सांप्रदायाचे प्रवाहात आणले ,आणि माझे जीवन बदलले .ही वारी तात्यांची वारी होती ,असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढत व्यसनापासून मुक्त आणि जीवनाची दिशा बदलणारा प्रवाह आहे तो म्हणजे वारकरी सांप्रदाय असे त्यांनी यावेळी सांगितले .

Post a Comment

 
Top