0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतही किराणा किंवा भाजी घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव घालण्यासाठी आता सायंकाळी चारनंतर  शहरातील किराणा तसेच भाजीपाल्याची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जेजुरी नगरपरीषदेने घेतला आहे. या आदेशातून औषधांच्या दुकानांना वगळण्यात आले असले तरी, सायंकाळनंतर रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका आणि पोलिसांनी दिला आहे.
 
राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून पुणे जिल्ह्यात सुद्धा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. त्याचाच गैरफायदा घेत नागरिक सामान आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडून विनाकारण हिंडत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांत सायंकाळी चारनंतर किराणा व भाजीची दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळनंतर या शहरांत रस्त्यांवर फिरताना आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जेजुरी नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी पुनम कदम यांनी नगरपरीषद क्षेत्रात फळे, भाजीपाला विक्रीची दुकाने, किराणा मालाची दुकाने सकाळी 10  ते सायंकाळी 4 या वेळेतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने सकाळी 6 ते 8 व सायंकळी 6 ते 8 या दरम्यान चालु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे तसेच औषधालये आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या सेवांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच अधिकृत वेळेत सुद्धा भाजी व फळे विक्रिचा अधिकार नगरपरीषदेच्या परवानाधारक विक्रेत्यांनाच असणार आहे तसेच मास्क लावणे बंधनकारक असणार आहे , नियमांची अंमलबजावणी न करणार्या विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.


नागरिकांचे बहाणे

टाळेबंदीमुळे घरात बसून बसून कंटाळलेले नागरिक या ना त्या बहाण्याने सारखे घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी हटकल्यास किराणा वा भाजीखरेदीची कारणे सांगितली जातात. तर औषधाच्या गोळय़ांची जुनी पाकिटे घेऊन औषध शोधण्यासाठी बाहेर पडल्याचेही सांगण्यात येत असल्याचा अनुभव काही पोलीसांनी सांगितला.

Post a Comment

 
Top