0
     पुरंदर ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुक्यातील गराडे आणि चांबळी या गावातील जनावरांच्या दवाखान्याची श्रेणीवाढ होणार असून याबाबतच्या प्रस्तावाला पशुसंवर्धन विभागाकडून लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या सदस्या ज्योती झेंडे यांनी दिली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनास दिला होता असेही त्या म्हणाल्या.
        सध्या येथील दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक आणि एक शिपाई असे दोनच कर्मचारी असतात. श्रेणी वाढ झाल्याने दोनही दवाखान्यात अनुक्रमे एक क्लास वन डॉक्टर, एक ड्रेसर आणि दोन शिपाई असा संपूर्ण स्टाफ उपलब्ध होणार आहे. याशिवाय दवाखान्यात सुविधांची देखील वाढ होणार आहे. स्थायी समिती सदस्य दिलीप आबा यादव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्री. यादव म्हणाले, आयुक्तांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचनेनुसार याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. पशुसंवर्धन विभागाने पुढील कार्यवाहीसाठी वित्त विभागाकडे पाठवला असता त्यात काही त्रुटी आढळून आल्या. त्याची पूर्तता करून हा प्रस्तवा अंतिम मान्यतेसाठी आता शासनास सुपूर्द केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असेही श्री. यादव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना गावातच सुविधा - कामठे
    याबाबत बोलताना चांबळी येथील मा. उपसरपंच एकनाथ कामठे म्हणाले, सध्या गावातील दवाखाना तृतीय श्रेणीचा असून श्रेणीवाढ झाल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी जनावरांना घेऊन जाण्याची यापुढे गरज भासणार नाही.

Post a Comment

 
Top