0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - कोरोनाच्या संकटकाळात लोकांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी, कामगार व व्यावसायिक लोक वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक अडचणीत आहेत. अनेक कुटुंब पाणीपट्टी आणि घरपट्टी देखील भरण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे सासवड व जेजुरीच्या नागरिकांची घर व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे १४ मे रोजी त्यांनी याबाबत मागणी केली आहे. सासवड व जेजुरी नगरपालिकेलाही त्यांनी तशी मागणी केली आहे.
     याबाबत शिवतारे म्हणाले, जेजुरीच्या नागरिकांनी याबाबत आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. येथील घरपट्टी बाबत पालिकेने घोषणा केली आहे परंतु तसा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. दोनही नगरपालिकांनी संकटाच्या काळातील ही स्थिती लक्षात घेऊन ह्या आकारण्या रद्द करणे गरजेचे आहे. त्यातून सर्वसामान्य लोकांना बऱ्यापैकी दिलासा मिळेल.
    शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोंगळे, नगरसेविका अस्मिता रणपिसे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, जेजुरी शहरप्रमुख महेश स्वामी, प्रसाद खंडागळे यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. नगरपालिकेने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. त्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यायला लागू नये असे नगरसेवक सचिन भोंगळे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

 
Top