0
 पुरंदर ( प्रतिनिधी ) - माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडून पुरंदर हवेलीतील डॉक्टरांना पीपीई किट, एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क, फेसशिल्ड अशा साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या वतीनेही २२ डॉक्टरांना पीपीई किट देण्यात आल्याचे शिवसेनेचे सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप यांनी सांगितले. यावेळी श्री. देवळे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त प्रसाद खंडागळे, नगरसेविका अस्मिता रणपिसे, विनस शिवतारे, हरिभाऊ लोळे आदी उपस्थित होते.
     याबाबत शिवतारे म्हणाले, पुण्या-मुंबईत अनेक दवाखान्यात डॉक्टरांना पीपीई किट किंवा इतर सुविधा नसल्यामुळे रुग्णसेवा बंद आहेत. अशा स्थितीत पुरंदर-हवेलीमध्ये रुग्णसेवा अखंड सुरू राहावी आणि डॉक्टरांचेही संरक्षण व्हावे यादृष्टीने पीपीई किट व इतर सामग्रीचा आम्ही पुरवठा सुरू केला आहे. सर्व डॉक्टरांना ही सामग्री दिली जाईल. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून इतरांना कोरोनाची लागण होऊ नये हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे हे पीपीई किट व साधन सामग्री त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. हवेली तालुकाप्रमुख संदिप मोडक, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे,माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी, युवासेनेचे मंदार गिरमे, प्रविण लोळे आदी पदाधिकारी डॉक्टरांशी समन्वय साधून हे साहित्य पोचवण्याचे काम करत आहेत. ज्यांना हे संच हवे असतील त्यांनी या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही श्री. शिवतारे म्हणाले.

Post a Comment

 
Top