0
वाल्हे ( प्रतिनिधी ) - आज जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमा असा दुहेरी योग जुळून आला आहे. हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
   कोरोनाच्या संकटामध्ये आज वाल्हे (ता.पुरंदर) येथील भुजबळ कामठवाडी येथील महिलांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत वटपौर्णिमासण साजरा केला. सर्व महिलांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिलांनी तोंडाला मास्क लावून वडाची पूजा केली.
    खरंतर महिला आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने वाल्हे परिसरामधील अनेक भागात स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपताना पाहायला मिळत आहे. अनेक महिला घरातच राहून वटपौर्णिमेचा सण कोरोनाच्या सावटामुळे साजरा करत आहेत.
   निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. त्यात आज जागतिक पर्यावरण दिन देखील असल्याने दुहेरी योग जुळून आला आहे.
   सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाचं झाड गर्द सावली देखील देतं. अशा वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया स्वतःसाठी आणि पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे असे मत वाल्हे येथील महिलांनी वडाची पूजा करताना व्यक्त केले.

Post a Comment

 
Top