4
पुणे ( प्रतिनिधी ) -  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एकही शिवसेना आमदार निवडून येऊ शकला नाही. मागील विधानसभेत विजय शिवतारे, सुरेश गोरे आणि गौतम चाबुकस्वार असे तीन आमदार शिवसेनेला मिळाले होते. यंदा हा आकडा थेट शून्यावर येऊन पोहोचला. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांमध्ये पुणे जिल्ह्यातील एखाद्या नेत्याला आमदारकी मिळावी अशी मागणी शिवसैनिकांमधून जोर धरत आहे. त्यादृष्टीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याचे समजते.

      पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. इथे आढळराव आणि विजय शिवतारे हे राष्ट्रवादीशी सतत संघर्ष करून पक्ष जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. आढळराव यांचा करिष्मा मोठा आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीला संभाजी मालिकेसह जातीय राजकारणाचा आधार घ्यावा लागला इतकी राष्ट्रवादी त्यांच्यासमोर रडकुंडी आली होती. त्यामुळे त्यांचीही परिषदेत जाण्याची इच्छा आहे.

दुसरीकडे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातून त्यांनी दोन वेळा पवारांना पाणी पाजले तर २०१९ ला पवारांनी त्यांना चीतपट केले. शिवतारे हे लोकसभा निवडणुकीपासूनच किडनीच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे विधानसभेला त्यांना गावोगावी प्रचारही करता आला नाही. त्याचा फायदा घेत कॉंग्रेस राष्ट्रवादीने त्यांना पराभूत करण्यासाठी मोठा जोर लावला. २०१२ साली शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी सलग ८ दिवस आमरण उपोषण केले होते. उपोषणाने शिवतारे यांच्या दोनही किडन्या निकामी झाल्या. त्यांना किडनी प्रत्यारोपणसाठी डॉक्टरांनी सल्ला दिला होता. सुदैवाने त्यांना किडनी मिळाली असून कोरोनामुळे त्यांनी सध्या किडनी बदलण्याची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. पण मुत्राशायावर येणाऱ्या ताणामुळे त्यांना मधल्या काळात हृदयविकार जडला आणि बायपास सर्जरी करावी लागली. सध्या ते बऱ्यापैकी ठणठणीत झालेले असून त्यांनीही पक्षाकडे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचे समजते. पश्चिम महाराष्ट्रात पवारांना सळो की पळो करून सोडणाऱ्यामध्ये राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवतारे आणि आढळराव यांची मोठी भूमिका होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाने शिवतारे यांच्यावर मावळची जबाबदारी सोपवली होती. इथे त्यांचा थेट सामना अजित पवार यांच्याशी होता. अजित पवार यांच्याविरोधात शिवतारे यांनी या मतदारसंघात मोठी राळ उडवून दिली. पार्थ पवार यांचा इथे अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. त्याचीच परतफेड अजित पवारांनी पुरंदरमध्ये शिवतारे यांचा पराभव घडवून आणत केली. शिवतारे किंवा आढळराव यांच्यासारखा एखादा खमक्या विधानपरिषदेत पोचला तरी जिल्ह्यात पक्षाला पुन्हा संजीवनी मिळू शकेल.

      शिवतारे यांच्या समावेशाला पवार कुटुंबाकडून विरोध केला जाऊ शकतो असे राजकीय वर्तुळातून समजते. मात्र राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वी आमदारकी दिलेले अमोल मिटकरी यांनी ठाकरे घराण्यावर केलेली अत्यंत हीन पातळीवरील टीका पाहिल्यास ठाकरे यांनी त्यांना विरोध करायला हवा होता. परंतु तसे घडलेले नाही. म्हणूनच शिवतारे यांचा समावेश करताना ठाकरे यांनाही तशी कडक भूमिका घ्यावी लागेल. आढळराव यांनाही पवारांचा विरोध होऊ शकतो. परंतु तो शिवतारे यांच्याइतका तीव्र असेल असे वाटत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या दोनही नेत्यांची यानिमित्ताने चांगलीच कसोटी लागणार आहे. पण नीलम गोऱ्हे यांना संघटनात्मक कामात मर्यादा असल्याने शिवतारे किंवा आढळराव यांच्यापैकी कुणीतरी विधानपरिषदेत असावे अशी जिल्ह्यातील शिवसैनिकांची अपेक्षा आहे.

Post a Comment

 1. अत्यंत गरजेचे आहे....
  जय महाराष्ट्र.

  ReplyDelete
 2. नक्कीच भेटली पाहिजे आमदारकी सेनेला काळाची गरज आहे

  ReplyDelete
 3. शिवसेना वाढीच्या दृष्टीने ही काळाची गरज आहे

  ReplyDelete
 4. खासदार लेवल च्या लोकांना आमदारकी कशाला ????
  आमदारकी आमदार लेवल च्या माणसाला च भेटावि !

  ReplyDelete

 
Top