0
जेजुरी  ( प्रतिनिधी )-  कोरोना लोकडाऊन काळात बंद करण्यात आलेली हेअर कटींग सलून पूर्ववत सुरु करून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या मागणीकड़े राज्यकर्ते व शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातील सलून दुकानासमोर काळीफिती लाऊन १० जुने २०२० रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी सांगितले.                                   

              गेल्या अडीच महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायकांची आर्थिक कोंडी झाली आहे. या बाबत मुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री व आमदार तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नाभिक समाज व्यावसायिकांचे प्रश्न व  समस्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आले. तरी देखील राज्यकर्त्यांनी व शासनकर्त्यांनी या व्यावसायिकांकडे जाणूनबुजून दुर्लक्षच केले असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.                                             

             लॉकडाऊनच्या काळात इतर  व्यवसाय व उदयोगांना परवानगी दिलेली आहे. त्या प्रमाणेच सलून व्यवसाय सुरु करण्यास परवाणगी द्यावी व भरीव आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने केलेली असतांना देखील शासनाने या मागणीची दखल न घेतल्याने राज्यकर्ते व शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सलून व्यावसायिकांचे हे लक्षवेधी आंदोलन पुकारले आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्हास न्याय मिळाला पाहिजे, सलून व्यवसाय हा नाभिक समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे. या शिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. या बंद मुळे हा व्यवसाय बंद होतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .                                         

        महाराष्ट्रात सलून व ब्युटी पार्लर दुकानांपैकी जवळपास ७० ते ८०% दुकाने भाडे तत्वावर असून उरनारीत २०% दुकाने स्वमालकिची आहेत . राज्यात या शहर व ग्रामीण भागातील २५ लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. सध्या लॉकडाऊनमुळे स्वमालकीचे अथवा भाडेतत्वावर घेतलेले सलून दुकान बंद असल्याने दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्जाचे  हप्ते अशी अनेक देणी वाढत आहे बँक कर्जाच्या हप्त्यासाठी  तर जागामालक जागेच्या भाड्यासाठी तगादा लावत आहे. अश्या चक्रव्यूहात सलून व्यावसायिक सापडलेला आहे. त्यामुळेच राज्यकर्त्याचा निषेध करीत आज संपूर्ण महाराष्टात लक्ष्यवेधी आंदोलन होत असल्याचे बिडवे यांनी सांगितले.                                     


         या आंदोलनात राष्ट्रीय नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नेते भगवानराव बिडवे यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश खड़के, नाभिक युवा सेना  प्रदेशाध्यक्ष अंकुश बिडवे, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई कर्हेकर, जिल्हा नेते भगवान शिंदे, मोहन सूर्यवंशी याच्या उपस्थितीत कात्रज येथे सलून दुकानासमोर काळी फिती बांधून शासनाचा निषेध करीत आंदोलन केले. यावेळी दीपक सोनावणे, अमोल दळवी, संदीप ननावरे, हेमंत साबळे, सुदर्शन काशीद, श्रीमंत सुरवसे, विठ्ठल सांगळे, विजय जाधव, अनिल माने, अरुण कालेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले.

Post a Comment

 
Top