0
इंदापूर  : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांच्या पक्षांतराने कमकुवत झालेल्या इंदापूर तालुक्यातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या व आगामी काळात इंदापूर नगरपालिका हेच पहिले टार्गेट ठेऊन काँग्रेस पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने मंगळवारी (७ जुलै) पुरंदरचे आमदार व पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत इंदापूर तालुका काँग्रेसच्या विविध पदांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या.

२००९ पर्यंत इंदापूर तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी अनेक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना पक्ष न सोडण्याची गळ घातली होती, तर अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडताय म्हणून साखर वाटत आनंदोस्तव साजरा केला होता. पाटील यांच्या पक्षांतरामुळे इंदापूर तालुक्यामध्ये मजबूत असणारी काँग्रेस अचानक कमकुवत झाल्याचे सर्वानाच ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याच्या, तसेच भविष्यात येऊ घातलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या अनुषंगाने इंदापूर येथे मंगळवारी (७ जुलै) काँग्रेस पक्षाचे पुरंदरचे विद्यमान आमदार व पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा युवकचे सरचिटणीस जावेद शेख, वीरधवल गाडे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या उपस्थितीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी इंदापूर शहराध्यक्ष पदी पुरोगामी विचारसरणीचे तानाजीराव भोंग, पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी सामाजिक कार्यकर्ते जकीरभाई काझी, इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी बिभीषण लोखंडे, शहर उपाध्यक्ष म्हणून तुषार चिंचकर, शहर कार्याध्यक्ष पदी चमनभाई बागवान, विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी शंभूराज साळुंके तर उपाध्यक्ष म्हणून प्रमोद खबाले, तालुका सरचिटणीस म्हणून नितीन राऊत, आणि इंदापूर शहर सहसचिव म्हणून सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तानाजीराव भोंग यांनी दिली.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संजय जगताप यांनी, अनेक संकटानंतरही काँग्रेसचे अस्तित्व टिकण्यामागे काँग्रेसची नाळ कोण्या नेत्याशी नव्हे तर सामान्य जनतेशी घट्ट जुडलेली असल्याचे नमूद करताना, 'सामान्य जनता हेच काँग्रेस पक्षाचे खरे बळ' असल्याचे म्हटले. तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी पक्षसंघटनवाढीसाठी केलेल्या कामांचे देखील संजय जगताप यांनी कौतुक केले. आगामी इंदापूर नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यात पक्षाला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगताना, संजय जगताप यांनी इंदापूर नगरपालिका हेच आगामी काळातील आपले पहिले टार्गेट असल्याचे आवर्जून सांगितले. सध्या इंदापूर नगरपालिका व पंचायत समितीवर प्रत्यक्ष काँग्रेसची सत्ता असली तरी अप्रत्यक्ष हर्षवर्धन पाटील गटाचेच वर्चस्व असल्याचे मानले जाते.

यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड झालेल्या जकीर काझी यांनी, 'सामाजिक कामे हाच आपल्या राजकारणाचा पाया असून भविष्यात सामाजिक कामांच्या जोरावरच तालुक्यात पक्षाला ताकत देण्याचे काम आपण करणार असल्याचे सांगितले', तर शहराध्यक्ष पदी निवड झालेल्या तानाजीराव भोंग यांनी, 'कोणत्याही संकटात पक्षाच्या विचारांशी तडजोड करणार नसल्याचे सांगत, पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले'.

Post a Comment

 
Top