पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्यात ढगफुटीमुळे अनेक गावांमध्ये प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. कुणाची घरे, कुणाची पिके तर कुणाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या अतिवृष्टीचे ताबडतोब पंचनामे सुरू करा आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी उचित कार्यवाही करावी असे निर्देश माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना याबाबत तातडीने पत्रव्यवहार शिवतारे यांनी केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत यांनाही त्यांनी याबाबत कळविले आहे. याबाबत शिवतारे म्हणाले, कोरोनाच्या काळात शेतकरी आधीच तोट्यात गेलेला आहे. दुधाला पुरेसा भाव मिळत नसल्याने पूरक व्यवसायाची स्थितीही काहीशी नाजूकच आहे. अशा वेळीच ढगफुटी आणि अतिवृष्टीचे हे दुहेरी संकट समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कळविले आहे. पंचनाम्याबद्दल काही तक्रारी असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असेही शिवतारे यांनी सांगितले आहे.
दरम्यान सासवड, पिंपळे, पांगारे, पिलाणवाडी, यादववाडी, परींचे, राऊतवाडी, वीर, पिंगोरी, दौंडज, वाल्हे, हरणी, जेऊर, मांडकी व इतर अनेक गावांना मोठा तडाखा बसल्याचे वृत्त आहे.
Post a comment