0

 पुरंदर ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुक्यातील सरकारी दवाखान्यात आणि कोविड सेंटर्समध्ये सोयी सुविधा निर्माण करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे. रुग्णाला व्हेंटिलेटर लागल्यास खाजगी दवाखान्यात लाखो रुपयांची बिलं केली जातात. पुरंदर तालुक्यात नेत्यांशी संबंधित सासवड व जेजुरी येथे दोन दवाखाने आहेत. त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याची शंका लोक व्यक्त करू लागले आहेत असा खळबळजनक खुलासा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. 

                शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती स्फोटक बनल्यावर रुग्णसेवा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. येत्या काही दिवसात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहेत. याबाबत शिवतारे म्हणाले, लोक तडफडून मरत आहेत. प्रत्येक श्वासासाठी माणसाच्या जीवाचा आटापिटा चालू आहे. व्हेंटिलेटर लागला तर बिलं दोन अडीच लाखाच्या घरात जात आहेत. सामान्य माणूस एवढे पैसे देऊ शकत नसल्यामुळे सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर्सची सोय करावी यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. सासवड ग्रामीण रुग्णालयात दोन-तीन व्हेंटिलेटर आले देखील पण आता व्हेंटिलेटर्स हाताळणारे तज्ञ डॉक्टर, भुलतज्ञ आणि स्टाफ नसल्याचं कारण अनेक दिवसांपासून दिलं जात आहे. शहरातील एका प्रख्यात वृत्तपत्र विक्रेत्याची पत्नी वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्युमुखी पडली. अशा अनेकांना तडफडून जगाचा निरोप घ्यावा लागला. या सगळ्या गोष्टी वेदनादायक आहेत. गरिबांसाठी मी काही हालचाली केल्या तर यांचा धंदा बुडतो. माझ्या धावपळीमुळे विरोधकांचा आगडोंब होण्याचं तेच कारण आहे. येत्या दोन दिवसात सासवड ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा चालू न केल्यास मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी लागेल असेही शिवतारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Post a Comment

 
Top