0

 
   पुरंदर ( प्रतिनिधी )  - हडपसर सासवड जेजुरी नीरा रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शिवतारे यांनी पत्रव्यवहार केला आहे.   हडपसर सासवड जेजुरी नीरा रस्ता हा आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असून तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ म्हणून ओळखला जातो. आळंदी पंढरपूर या मार्गाचा हा भाग येतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी अपघातदेखील झालेले आहेत. विशेषतः दिवे घाटात रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. याबाबत शिवतारे म्हणाले, दिवे घाटात रस्त्याची चाळण झालेली आहे. भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळी, पवारवाडी, सासवड, शिवरी, दौंडज, वाल्हे इत्यादी गावांच्या हद्दीत रस्ता खड्ड्यांनी जर्जर झाला आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला मी सूचना केल्या असून तसा लिखित पत्रव्यवहारदेखील केला आहे. लवकरच दुरुस्ती करून घेण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेले आहे. मात्र त्यात हलगर्जीपणा झाल्यास रस्त्यावर उतरायला लागेल असा इशाराही शिवतारे यांनी दिला आहे.


Post a Comment

 
Top