पुणे

अजून एक थरार आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळले ?

पुणे प्रतिनिधी:–
जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका २५ वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस, मुख्य महामार्गालगत हे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा व दीड वर्षांच्या बाळाचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेह इतके जळाले होते की,ओळख पटवणे अवघड जात आहे. मात्र यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे.

प्राथमिक माहितीनुसार तिघांना अन्यत्र ठार मारून नंतर येथे आणले गेले आणि पेट्रोल टाकून मृतदेह पेटवण्यात आले. मात्र, पावसामुळे आग पूर्णपणे विझल्याने काही पुरावे मिळाले आहेत. मृतदेह महामार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आढळून आले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या अमानुष हत्याकांडामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांचा तपास काढण्यासाठी युद्धपातळीवर तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893906
error: Content is protected !!