आमदारांची सभागृहात हाणामारी टळली… पण शब्दांचे बाण सुटले…
अकोला प्रतिनिधी:–
अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक नेहमीप्रमाणे
जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराचं रणांगण ठरली.
पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून तीव्र वाद झाला.
वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही आमदार एकमेकांकडे धावून गेले आणि सभागृहात अश्लील भाषेचा वापर करत एकमेकांवर तुटून पडले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून हाणामारी टळवली.
“विकास बैठकीत अश्लील भाषेचा वापर, राजकीय परिपक्वतेचा अभाव !”
या प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा नियोजन समिती सारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या व्यासपीठावर दलित वस्तीच्या विकासासारख्या गंभीर विषयावर झालेला हा वाद म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचा नमुना असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या बैठकीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पाहिलं जातं, मात्र राजकीय ईगो आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे यावेळी लोकप्रतिनिधींनी संसदीय व सौजन्याची मर्यादा ओलांडल्याची टीका होत आहे.
लोकप्रतिनिधींनी संयम गमावल्याने विकासाच्या चर्चा ढासळल्या दलित वस्तीच्या विकासासाठी असलेल्या मुद्द्यावर राजकीय धुसफूस अकोल्यातील जनतेत नाराजीचे सूर; राजकीय वर्तनावर सवाल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादानंतर जिल्हा प्रशासनाने यापुढील बैठकींसाठी अधिक कठोर नियमावली तयार करण्याची तयारी केली आहे