अंबाजोगाई(प्रतिनिधी):- सध्या सर्वत्र डॉल्बीचे पेव फुटले असतानाही आपली पारंपरिक वाद्य संस्कृती जोपासण्याचे काम प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हे ढोल ताशा वाद्य स्पर्धेच्या माध्यमातून जोपासत असल्याचा आनंद अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी व्यक्त केला. ते अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित भव्य अशा ढोल ताशा पथक वाद्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयोजक संकेत राजकिशोर मोदी यांच्यासह सहा पोलीस निरीक्षक कांबळे, दैनिक लोकमत चे अविनाश मूडेगावकर, आधार माणुसकीचे ऍड संतोष पवार, मनोज लखेरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाणे, माजी नगरसेवक अमोल लोमटे, दिनेश भराडीया, सुनील वाघाळकर, पंडित हुलगुंडे, सय्यद रशीद , शाकेर काझी, विजय रापतवार, खलील जाफरी, भीमसेन लोमटे, माणिक वडवणकर , राम घोडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
या स्पर्धेची सुरुवात श्रीगणेश पूजन, वाद्य पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आली. या स्पर्धा आयोजित करण्याची कारणमीमांसा संकेत मोदी यांनी आपल्या प्रस्ताविकातून केली. पुढे बोलताना ते म्हणाले की अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेसाठी संपूर्ण मराठवाड्यात ओळखले जाते. या परंपरेला अधिकाधिक जोपासण्याचे आणि पुढे नेण्याचे काम प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. वेळोवेळी समाजहिताचे उपक्रम राबवून मंडळाने नेहमीच शहराचे वैभव वाढवले असल्याचे संकेत मोदी यांनी स्पष्ट केले.
मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रमांना गती मिळाली असून, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचे उत्तम उदाहरण म्हणून मंडळाने शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२०२३ साली सुरू करण्यात आलेल्या ढोल ताशा पथक स्पर्धेला स्पर्धकांनी दिलेला प्रतिसाद हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा ठरली असल्याची भावना देखील याप्रसंगी व्यक्त केली. २०२५ मध्ये या स्पर्धेचे तिसरा पर्व अधिक भव्य, आकर्षक आणि ऐतिहासिक स्वरूपात आपण अनुभवत आहोत, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून ही ढोल ताशा पथक स्पर्धा घेण्यामागचा खरा उद्देश म्हणजे अंबाजोगाईतील वाद्यप्रेमींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांची कला पुढे जावी हाच असल्याची भावना संकेत मोदी यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली. आजची ही स्पर्धा केवळ ढोल ताश्यांच्या तालापुरती मर्यादित नसून, ही तर आपल्या परंपरेला नवा जोश, नवी दिशा देणारी असल्याचे अभिमानाने सांगत या स्पर्धेकडे खिलाडू वृत्तीने घ्यावी असेही संकेत मोदी यांनी नमूद केले.
या ढोल ताशा स्पर्धेत आधार माणुसकीचे ऍड संतोष पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा पर मनोगतात त्यांनी नाशिक ढोल जसा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे येत्या काळात अंबाजोगाई चा ढोल देखील प्रसिद्ध होईल असा आशावाद व्यक्त केला. सध्या सर्वत्र डॉल्बीच्या गोंगाट चालू असताना देखील शहरातील प्रियदर्शनी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ हे संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आपली प्राचीन वाद्य परंपरा ढोल ताशा वाद्य स्पर्धेच्या माध्यमातून जोपासत असल्याबद्दल पो नी शरद जोगदंड यांनी आनंद व्यक्त केला. अंबाजोगाई शहरात अशा प्रकारची ढोल ताशा स्पर्धा ही प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केल्या जाते याबाबत आनंद व्यक्त केला. ढोल ताशा ही देखील एक खेळाचाच प्रकार असून या खेळामुळे मनोरंजन, व्यायाम व नशामुक्तीचा संदेश दिला जात असल्याचे शरद जोगदंड यांनी याप्रसंगी सांगितले. ढोल ताशा वाद्य स्पर्धेचा आवाज ऐकून अंगावर शहारे येऊन माणूस यामध्ये तल्लीन होऊन जातो. राजकिशोर मोदी व संकेत मोदी हे अंबाजोगाई शहरात ढोल ताशा वाद्य स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करून येथील वादकाना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून यापुढेही त्यांनी असेच उपक्रम आपल्या तरूणाई साठी राबवावेत अशी भावना व्यक्त करत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी छोट्या स्पर्धकांसह मुले व मुली असलेले अनेक संघ सहभागी झाले होते.
ढोल ताशा स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील परीक्षक शरद दांडगे , शुभम सिरसाळकर, चिन्मय कुलकर्णी, अथर्व देशपांडे हे उपस्थित होते. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी संकेत मोदी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.