
बीड प्रतिनिधी:- पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचा दबदबा कमी झाल्याच्या चर्चा सुरू असतांनाच माजलगावच्या लाच प्रकरणात प्रभारी अधिकार्याला तातडीने नियंत्रण कक्षात सलग्न करत एसपींनी आपल्या कर्तव्यकठोर भुमिकेची आठवण करून दिली होती. आता या आणखी एक भर पडली असून पवन निंबाळकर या पीएसआयला देखील लाच प्रकरणाचा ठपका ठेवून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. नवनीत कॉवत यांनी दोन दिवसात दोन अधिकार्यांना दिलेले दणके जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरत आहेत.
माजलगावात वाळू वाहतूक सुरळीत राहण्यासाठी 20 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने ही मागणी तक्रारदाराकडे केल्यानंतर जालन्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार देण्यात आली. त्यानुसार जालन्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधिक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला, यावेळी कदम यांच्या खाजगी व्यक्ती असलेल्या तात्यासाहेब आर्डे याने सदर रक्कम स्विकारताच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणात अमोल कदम आणि तात्यासाहेब आर्डेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास माजलगावचे प्रभारी असलेल्या राहूल सुर्यतळ यांना नियंत्रण कक्षात सलग्न करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी बीडच्या होम डिवायएसपीचा पदभार असलेल्या उमाशंकर कस्तुरे यांना माजलगाव येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी अमोल कदमला निलंबीत करण्यात आले असून या प्रकरणातील दोषी असलेल्या पीएसआय पवन निंबाळकरलाही एसपींनी दणका दिला आहे. त्याचीही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने एसपींच्या या दणक्यांच्या चर्चा पोलीस दलात पुन्हा सुरू झाल्या आहेत.
