अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ३३ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १० लाख ८०० रुपये इतकी आहे.
धर्मापुरी येथील भास्कर उर्फ बबलू फड याला गांजाची खेप पोहोचविण्यासाठी नितीन कांदे व भाऊ चौधरी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मूर्ती फाट्याजवळ सापळा रचला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता नितीन कांदे याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पंचनामा केला असून रात्री उशिरा बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक घुले, खरमौले तसेच विशेष पथकातील कदम, नागरगोजे, फड, आवले, शिरसाट, श्रीमंगले आणि होमगार्ड शेख जिलानी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या धाडसी कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अंबाजोगाई परिसरातून पोलीस दलाचे कौतुक होत आहे. तसेच अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
