केज प्रतिनिधी :–केज-मांजरसुंबा रोडवर सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास केज पासून जवळ सांगवी-सारणी वळणावर एक ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बस पलटी होताच बसने पेट घेतला. अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत.
सोमवार दि.१६ रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जात असलेली भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस ही केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या सांगवी-सारणीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस मधील जखमी प्रवासी बाहेर पडत असताना बसने पेट घेतला.

मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.अपघाताची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळताच त्यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इमानदार व चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे हे तत्काळ अपघातस्थळी हजर झाले. त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. पोलिस, रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग, त्याचे इतर सहकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत.
