अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील कारखाना रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 4 लाख 73 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जान्हवी हॉटेल परिसर, कारखाना रोड येथे काही जण पत्त्यांवर पैसे लावून “तिर्रट” नावाचा जुगार खेळत आहेत.
या माहितीनुसार पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पथकाने छापा टाकला असता सहा आरोपी गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद खतीब (वय 50), सद्दाम बागवान (वय 30), शेख अजहर जिलानी (वय 48), श्रीराम बारगजे (वय 39), नागनाथ ढगे (वय 22) व धर्मराज वाघमारे (वय 39) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 11,670 रुपये रोख, 1 लाख 37 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली असा एकूण 4,73,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोंगदंड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोउपनि आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, सुशांत गायकवाड व भागवत नागरगोजे यांचा सहभाग होता.पुढील तपास पोलीस हवालदार विजयसिंग गायकवाड करीत आहेत.
