अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (स्वाराती) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मंदार दाभाडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते ‘स्वाराती’ रुग्णालयात पीजी शिक्षण घेत होते. ते रोहिदास कॉलनी परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते. अत्यंत होतकरू, अभ्यासू आणि रुग्णसेवेसाठी समर्पित अशी त्यांची ओळख होती. उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील वाढता ताणतणाव, दीर्घ कामाचे तास आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवासी डॉक्टरांवर असलेला कामाचा ताण आणि भावनिक दबाव याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी मोठी हानी ठरली असून, एका होतकरू डॉक्टरचा असा अकाली अंत सर्वांनाच चटका लावणारा ठरत आहे.
