अहिल्यानगर प्रतिनिधी : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर आज हृदयद्रावक अपघात घडला असून एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. समोरासमोर झालेल्या या धडकेत कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि जागीच आठ जणांचा मृत्यू झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले आणि बचावकार्य सुरू केले. दरम्यान, माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले तसेच गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
