छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
धडक इतकी भीषण होती की, कार तब्बल १०० फूट फरफटत गेल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कारमधील दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मात्र चालकाचे पाय कारमध्ये अडकले असल्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कारने अचानक पेट घेतला आणि भीषण आग लागली. या आगीत चालक पवन अजमेरा (वय ५२) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
या अपघातात ईशा अजमेरा व विना अजमेरा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत .
