केज प्रतिनिधी : शहरातील मंगळवार पेठ परिसरात मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनिल अशोक सूर्यवंशी यांचे गजानन अॅग्रो एजन्सी या कृषी सेवा केंद्रातून आगीची सुरुवात झाली. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण करत शेजारील दुकाने गाठली.
या आगीत गजानन अॅग्रो एजन्सीमधील किटकनाशके, तणनाशके, विद्राव्य खते, लिंबोळी पेंड तसेच दुकानातील फर्निचर जळून खाक झाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच शेजारील खंडेश्वर पशु खाद्य ट्रेडर्स, प्रकाश मुंडे यांचे मोटार व इलेक्ट्रिक दुरुस्तीचे दुकान, नारायण नेहरकर यांचे चहाचे हॉटेल आणि दत्ता देशमुख यांचा दत्तात्रय फोटो स्टुडिओ या दुकानांनाही आगीचा फटका बसला. मोटार रिवाइंडिंग, पशुखाद्य व हॉटेल व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास सुरू आहे.
