परंडा : एकीकडे पठाणकोट सीमेवर भारतीय सैन्यदलात कार्यरत राहून विशाल महादेव शिवणकर देशाचे प्राणपणाने रक्षण करत असताना, दुसरीकडे त्यांच्या घरी मात्र काळजाचा तुकडा असलेल्या वडिलांवर २८ मे राेजी दुपारी खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिशीच्या पैशांच्या वादातून गावातील बाप-लेकाने केलेल्या अमानुष मारहाणीत ५५ वर्षीय महादेव कृष्णा शिवणकर यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृतू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
मयत महादेव शिवणकर यांचा मुलगा विशाल हा भारतीय सैन्यात असून पठाणकोट येथे देशाची सेवा बजावत आहे. आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारे महादेव शिवणकर हे चिंचपुर (खुर्द) येथे राहत होते. आरोपी दीपक विक्रम गरड याच्याकडे महादेव शिवणकर यांची भिशीची रक्कम अडकली होती. २८ मे रोजी दुपारी महादेव यांनी आपल्या हक्काचे पैसे मागितले असता, दीपकने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने दीपक आणि त्याचे वडील विक्रम गरड यांनी महादेव यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
त्यानंतर, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघालेल्या महादेव यांना रस्त्यात गाठून, त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारून पाडण्यात आले. यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि मोटारसायकलच्या साखळीने त्यांना पुन्हा अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत महादेव शिवणकर यांना सुरुवातीला शेळगाव येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परंडा आणि नंतर बार्शी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, २९ मे रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या विशाल शिवणकर यांच्यावर आभाळ कोसळले आहे.
खुनाचा गुन्हा नाेंद
आरोपी विक्रम गरड आणि दीपक गरड यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १०३(१) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सैनिकाच्या वडिलांच्या झालेल्या हत्येमुळे परिसरात आरोपींविरुद्ध तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
