छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिबंधित गुटखा व इतर अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक व वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत गुटखा माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने १ जून रोजी केलेल्या कारवाईत पाच वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनांमधून एकूण रु. 8,94,528 किंमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईत वापरण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत रु. 41 लाख असल्याचे समोर आले आहे.
जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित माल आणि वाहने यांची एकूण किंमत रु. 49,94,528 इतकी असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत.
