*योगेश्वरी सैनिक स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
● अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी सैनिक स्कूलचा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डॉ. सुरेश खुरसाळे होते. प्रमुख पाहुणे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत होते. विशेष निमंत्रित म्हणून अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे,कर्नल सतीश हंगे, उपसंचालक सैनिकी कल्याण विभाग हे होते.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सैनिक स्कूलची या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली असून सहावीच्या पहिल्या तुकडीचा प्रवेशोत्सव ढोल ताशाच्या गजरात ,पारंपारिक हलगीच्या नादात मुलींच्या ढोल पथकाच्या वाद्य वृंदात झाला.
यावेळी बोलत असताना बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले की, मी सुद्धा सहावीपासून सैनिकी शाळेतच शिकलो. सैनिकी शाळेमध्ये शिक्षण आणि शिस्त या दोन्हीचा संगम घडवून विद्यार्थ्यांची घडवणूक केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन तसेच आत्मविश्वास वाढावा याकरिता शिस्त लावली जाते. शिक्षणासोबत शिस्त असली की देशाचा एक सजग नागरिक बनण्यास अत्यंत काटेकोरपणे मदत होते. आज सहावीला विद्यार्थ्यांना सोडायला आलेल्या पालकांना पाहून मला सुद्धा माझ्या सैनिकी शाळेच्या पहिल्या दिवसाची म्हणजे प्रवेशाची आठवण झाली. माझेही पालक अशाच पद्धतीने सोडायला आले होते. याच सैनिकी शाळेच्या माध्यमातून मला लागलेल्या शिस्तीमुळे आज मी आयपीएस बनू शकलो. याचा मला सार्थ अभिमान आहे.आपण सुद्धा सैनिकी शाळेमधून शिक्षण घेऊन देश सेवला स्वतःला अर्पण करून घ्यावे असा संदेश दिला.
यावेळी बोलत असताना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश खुरसाळे म्हणाले 1917 साली लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तदपासून ते मागील चार वर्षांपूर्वी रक्षा मंत्रालयाकडे केलेल्या अर्जानुसार व चार वेळेस झालेल्या इन्स्पेक्शनद्वारे या सैनिकी शाळेतला मान्यता मिळाली व आज प्रवेशोत्सव होताना अत्यंत आनंद होत आहे. देशभक्तीपर विचारातून झालेल्या संस्थेच्या स्थापनेपासून ते सैनिकी स्कूलच्या होणाऱ्या प्रवेश पर्यंत विद्यार्थी देशसेवेसाठी घडविण्याचे काम या संस्थेद्वारे केले जात आहे व केले जात राहील. तर संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी प्रास्ताविकात प्रयत्नांती मिळालेल्या या सैनिक स्कूल मधून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन देशसेवा करावी असे मत व्यक्त केले.
सैनिक स्कूलचे प्राचार्य मेजर एस पी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मेजर एस पी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना देश सेवेची प्रतिज्ञा सांगितली व त्यांच्याकडून ती म्हणून घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी केले.या कार्यक्रमास योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, अंबाजोगाईतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नुकतेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश्वरी सैनिक स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
