केज प्रतिनिधी :–
केज तालुक्यातील बनकरंजा येथे 48 लाखांच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थाने लाथ मारताच पुलाचा संरक्षक कठडा कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारांच्या लाडक्या गुत्तेदाराचा प्रताप समोर आला आहे.
केज तालुक्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुत्तेदारांच्या मनमानी कारभाराचा आणि निकृष्ट कामाचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केज तालुक्यातील बनकरंजा येथे 48 लाखांच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थाने लाथ मारताच पुलाचा संरक्षक कठडा कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केजच्या आमदारांच्या लाडक्या गुत्तेदाराचा प्रताप समोर आला आहे.
शासकीय कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा एक जिवंत पुरावा बीड जिल्ह्यातून समोर आला आहे. बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. बनकरंजा ते चिंचपूर रस्त्यावरील तब्बल 48 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुलाच्या कामाची पोलखोल करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एका लाथेत 48 लाखांचा पूल भुगा झाला! सिमेंटऐवजी मातीचा वापर?
बनकरंजा येथील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. मात्र, हे काम डोळ्यांनाही निकृष्ट दर्जाचे दिसत असल्याने स्थानिक ग्रामस्थ दुर्गादास लांब यांनी थेट पुलावर जाऊन त्याची पाहणी केली. त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या संरक्षक कठड्याला दोन ते तीन लाथा मारल्या, तर काय आश्चर्य… संपूर्ण कठडा पत्त्याच्या बंगल्यासारखा कडकडून खाली कोसळला!
कठडा कोसळल्यानंतर आतील बांधकाम उघडे पडले, ज्यामध्ये सिमेंट आणि वाळूऐवजी थेट माती आणि निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तब्बल 48 लाख रुपये पाण्यात घालून नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या या कामाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आमदारांच्या ‘लाडक्या’ गुत्तेदाराला अधिकाऱ्यांचे अभय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या पुलाचे बांधकाम कंत्राटदार पंडित सावंत यांनी केले आहे. कंत्राटदार सावंत हे केज मतदारसंघाच्या स्थानिक आमदारांचे अत्यंत ‘लाडके गुत्तेदार’ असल्याची जोरदार चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे. आमदारांचा थेट वरदहस्त असल्यामुळेच या गुत्तेदाराने एवढे निकृष्ट काम करण्याचे धाडस केले आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी डोळे झाकून या कामाला मंजुरी दिली, असा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.
उच्चस्तरीय चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी
या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि इंजिनिअर्सच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून जनतेच्या पैशांची उघड लूट करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, पुलाचे ऑडिट व्हावे आणि दोषी कंत्राटदारासह त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी बनकरंजा परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे.
