बीड प्रतिनिधी : राज्यातील प्रलंबित असलेल्या २० जिल्हापरिषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शुक्रवारी पुन्हा ब्रेक बसला. शुक्रवारी यासंदर्भात परिणामकारक सुनावणी होऊ शकली नाही, आता या प्रकरणात सोमवारी (दि. २७ )सुनावणी होणार आहे
राज्यातील २० जिल्हापरिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून रखडलेल्या आहेत.ओबीसींना २७% आरक्षणाची अंमलबजावणी केल्यानंतर आरक्षण ५० % पेक्षा अधिक होत असल्याने या निवडणुका घेता आल्या नव्हत्या.सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी किती असावी? ५० % मर्यादेत हे आरक्षण कसे बसवायचे आणि यासंबंधित विषयांवरून याचिका प्रलंबित असून त्यात तातडीने निवडणूक घेण्याचे निर्देश मागणाऱ्या हस्तक्षेप अर्जांचाही समावेश आहे.यावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या.जोयमल्ल्या बागची,न्या.व्ही. मोहन्ना यांच्या पिठासमोर सुनावणी होत आहे. शुक्रवारी (दि. २४ ) हे प्रकरण ५२ व्या क्रमांकावर सुनावणीसाठी होते, मात्र शुक्रवारी यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी (दि. २७ ) ठेवण्यात आली आहे. सोमवारी निवडणुका तातडीने घेण्यासंदर्भाने राज्य निवडणूक आयोग आणि सरकारच्या वतीने काय भूमिका घेतली जाते आणि आरक्षणाच्या तिढ्यातून न्यायालय काय मार्ग काढते यावर जिल्हापरिषद निवडणुका नेमक्या कधी होणार हे ठरणार आहे.
