*लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख व लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकर स्मृती सदभावना समारोह*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मी केलेल्या कर्माची फळे मलाच भोगावयाची आहेत याचा देखील विसर माणसाला पडल्याचे उद्गार राष्ट्रीय समाज प्रबोधनकार तथा किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी काढले. ते प्रियदर्शनी क्रिडा, संस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने लोकनेते विलासरावजी देशमुख व लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित सद्भावना समारोहातील समाज प्रबोधनपर किर्तनात बोलत होते.
यावेळी मुकूंदराज संस्थान भजनी मंडळ व संस्थानचे ह.भ.प.किसन महाराज पवार, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ऍड.विष्णूपंत सोळंके, नगरपरिषदेचे गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, डॉ.राजेश इंगोले, विशाल जाजू, नगरसेवक महेश कदम, भिमसेन लोमटे, आकाश कराड, अकबर पठाण, सचिन जाधव, जावेद गवळी, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, पुरूषोत्तम चोकडा, प्रख्यात पखावज वादक उद्घवबापू आपेगांवकर, चंद्रशेखर वडमारे, भारत पिंगळे, भुषण मोदी, योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माणिक वडवणकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, माजी नगरसेवक गणेश मसने, माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर, अशोक देवकर, आसाराम जोशी, विजय रापतवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलन करून तसेच लोकनेत्यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली. ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचे स्वागत संयोजक राजकिशोर मोदी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन केले. आपल्या समाज प्रबोधनपर किर्तनात ह.भ.प.इंदुरीकर महाराजांनी ‘आतां तुम्ही कृपावंत | साधुसंत जीवलग ||१|| गोमटे ते करा माझें | भार ओझें तुम्हांसी ||२|| वंचिलें पायां-पाशी | नाही यासी वेगळें ||३|| तुका म्हणे सोडिल्या गांठी | दिली मिठी पायांसी ||४||’ हा संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अतिशय प्रसिद्ध आणि भावपूर्ण अभंगाचे विवेचन केले. या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संतांना आपले जीवाभावाचे सगेसोयरे मानून त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागती पत्करतात. अभंगाची रूपरेषा व भावार्थ कृपावंत आणि जीवलग : महाराज संतांना उद्देशून म्हणतात की, तुम्हीच माझे खरे दयाळू आणि जीवलग (प्राणापेक्षाही प्रिय) आहात. भार समर्पण : ‘गोमटे ते करा माझे । भार ओझे तुम्हांसी’ – माझ्या आयुष्याचे ओझे आणि भार आता मी तुमच्यावर सोपवला आहे. माझे हित कशामध्ये आहे, ते तुम्हीच ठरवा व करा. शरणागती : संतांच्या पायावर सर्व काही वाहून देऊन त्यांच्या चरणी मिठी मारल्याचा भाव या अभंगामध्ये व्यक्त झाला आहे. या अभंगाचा आधार घेवून विविध विषयाला हात घातला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करून पांडुरंगाला शेतकरी सुखी ठेव, धर्माचे रक्षण होवू देत, तसेच लोकांच्या गालावरचे हासू व घरातील समाधान अबाधीत राहू दे असे साकडे घातले. आज मानवाला मी कोण आहे ?, मी कुठून आलो आहे?, मला कोठे जायचे आहे ?, हेच कळाले नाही. याबाबत खंत व्यक्त केली. मी केलेल्या कर्माची फळे मलाच भोगावयाची आहेत. याचा देखील विसर माणसाला पडल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. याशिवाय माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावरच अवलंबून आहे असेही मत व्यक्त केले. पुस्तकी ज्ञानाने सुख मिळेल व अध्यात्माने समाधान तसेच पुस्तकी ज्ञानाने एक जन्म सुखी व्हाल मात्र अध्यात्मीक ज्ञानाने जन्म मृत्यूचा फेराच संपवाल असे मार्मिक मत ह.भ.प.इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले. जगात विज्ञानाने किती तरी शोध लावले. परंतु, जग ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाच्या बाहेर जाऊच शकले नाही. जगात वेगवेगळ्या कारखान्यांची उत्पत्ती झाली. मात्र रक्त बनविण्याचा कारखाना कोणीच बनवू शकले नाही. झाडाला पालवी फोडण्याचा शोध कोणीच लावू शकले नसल्याचे परखड मत महाराजांनी व्यक्त केले. आज जगात पैसा व प्रतिष्ठा यांच्या पुढे बुद्घीमत्ता कवडीमोल झाल्याचे महाराज म्हणाले. आज समाजात नैतिकता शिल्लक राहिली नसल्याची खंत देखील महाराजांनी व्यक्त केली. धर्माला आपणापासून ग्लानी पोहचेल असे वर्तन करू नका, आई-वडिल व गुरूंपेक्षा स्वत:ला मोठे समजू नका असे आवाहन ही ह.भ.प.इंदुरीकर महाराजांनी केले.आपल्या खास शैलीत त्यांनी संत-महात्म्यांच्या विचारांचा दाखला देत समाजातील वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. त्यांच्या कीर्तनातून अध्यात्म, सामाजिक जाणीव, नैतिकता आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. प्रामाणिकपणा व नीतिमत्तेची गरज आजची तरूणाई आणि पालकवर्ग यांच्याविषयी चिंता व्यक्त करताना इंदुरीकर महाराजांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. आपल्या कामातील प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता जोपर्यंत चांगली राहणार नाही, तोपर्यंत समाजाचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संत-महात्म्यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि दाखले देत त्यांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिला. त्याचबरोबर आपल्या खास विनोदी शैलीतील किस्से आणि मिश्कील उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वास्तवावर परखड भाष्य केले. त्यामुळे उपस्थित भाविकांना प्रबोधनासोबतच हास्याची मेजवानीही मिळाली. इंदुरीकर महाराजांच्या प्रभावी व ओघवत्या शैलीतील कीर्तनामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. यावेळी त्यांनी विरोधकांना देखील आपल्या मिष्कील भाषणातून हसवण्याची कसब दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या भाषणात होती असे मत लोकनेते विलासराव देशमुख व आडसकर तात्या यांच्याबाबत बोलतांना इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केले. हे नेते पुन्हा होणे नाहीत. याचीही खंत व्यक्त केली. अशा या थोर लोकनेत्यांचा वसा व वारसा प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी समर्थपणे चालवित असल्याबाबत त्याचे कौतुक करीत त्यानां ईश्वर दिर्घायुष्य देवो अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. यावेळी किर्तनास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यामध्ये युवक, ज्येष्ठ नागरिक व महिलांची उपस्थिती लक्षणिय अशी होती. इंदुरीकर महाराजांच्या प्रबोधनपर कीर्तनाने दिवंगत विलासराव देशमुख व बाबुरावजी आडसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदभावना समारोहाचा शुभारंभ झाला. यंदाचा सदभावना समारोह तीन दिवस चालणार आहे. प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी सुरू केलेली सदभावना समारोहाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सदभावना समारोहाला अंबाजोगाईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सामाजिक एकोपा, सदभावना आणि लोकनेत्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहावी, अशी जनभावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी मानले. समारोहाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत राजकिशोर मोदी, सचिन जाधव, विशाल जगताप, शरद काळे, अस्लम शेख, रोहित हुलगुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.
