सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा व्यक्त केला निर्धार
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
जिल्हा विधी सेवा तक्रार निवारण समिती, बीडच्या सदस्यपदी अंबाजोगाई येथील विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सामाजिक व विधी क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेशी संबंधित आवश्यक मार्गदर्शन मिळावे, गरजू व्यक्तींना विधी सेवा उपलब्ध व्हावी तसेच नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांचे योग्य पद्धतीने निराकरण व्हावे, यासाठी विधी सेवा यंत्रणेची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. अशा महत्त्वपूर्ण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने विनोद पोखरकर यांच्या सामाजिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल आमदार नमिता मुंदडा, अंबाजोगाईच्या नगराध्यक्ष नंदकिशोर काकाजी मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांचे विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना पोखरकर म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल आमदार नमिता मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर काकाजी मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांचा मी मनापासून आभारी आहे. मिळालेल्या या जबाबदारीचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गरजू व्यक्तींना योग्य विधी मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे करणार आहे.”
दरम्यान, या निवडीमुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विधी क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. विविध मान्यवरांकडून विनोद पोखरकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, गरजू नागरिकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रभावीपणे कार्य करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे, असेही पोखरकर यांनी स्पष्ट केले.
विधी सेवा तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
