आजपर्यंत 45 तोळे सोन्याचे दागिने व 1601 ग्रॅम चांदी पोलिसांच्या हाती
अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरातील बंद घर फोडून 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपी मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय 22, रा. शिवाजी चौक, परळी, जि. बीड) यास परळी रेल्वे पुलाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 18 तोळे (187.430 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 743 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (विट) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे अंबाजोगाई घरफोडी प्रकरणात आतापर्यंत 45 तोळे सोन्याचे दागिने आणि 1601 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
अंबाजोगाई येथील एक कुटुंब आपल्या राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 391/2026, कलम 331(3), 331(4), 3(5) बी.एन.एस. अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी पोलिसांनी अमर काकासाहेब थोरात (वय 23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय 32, रा. शिवाजी चौक, परळी, जि. बीड) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.
दरम्यान, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मंगलसिंग हिरासिंग बावरी हा गुन्हा करून पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा बाहेर जिल्ह्यात तसेच बाहेर राज्यात शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान मंगलसिंग बावरी हा बाहेर राज्यातून परळी येथे आपल्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि. 03 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने परळी रेल्वे पुलाजवळ गुप्त सापळा रचला. आरोपी मंगलसिंग बावरी तेथे येताच पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 18 तोळे (187.430 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 743 ग्रॅम चांदीचे दागिने (विट) असा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईमुळे अंबाजोगाई घरफोडी प्रकरणातील चोरीच्या मुद्देमालापैकी आतापर्यंत 45 तोळे सोन्याचे दागिने आणि 1601 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत. उर्वरित मुद्देमालाबाबत तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी श्री. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड; श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई; श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड; तसेच श्री. ऋषिकेश शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड (पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर), PSI सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, गोविंद राख, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे आणि चालक अतुल हराळे यांनी सहभाग घेतला.
