परळी प्रतिनिधी :-
परळी शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर #पोलिसांनी जोरदार कारवाईचा बडगा उगारला असून, #पंचशील नगर बसस्थानक परिसरातील #साई पॅलेस लॉजवर टाकलेल्या धाडीत तब्बल २९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (३१ ऑक्टोबर) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात लॉज मॅनेजरसह एकूण ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या धडक कारवाईने जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची अचानक धाड!
परळीतील साई पॅलेस लॉजच्या रूम क्रमांक ५०९ मध्ये ‘तिर्रट’ नावाचा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना मिळाली होती. लॉजचा मॅनेजर चंद्रकांत रामराजा राऊत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कमिशन घेऊन जुगार खेळवत असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीची दखल घेत पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.
रोख रक्कम, स्कॉर्पिओ, बुलेटसह लाखोंचा ऐवज जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून २ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम, विविध कंपन्यांचे १० मोबाईल, दोन स्कूटी, साडेतीन लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट आणि १५ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. यासह जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २९ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती आहे.
अकरा आरोपींवर गुन्हा दाखल
या कारवाईत भागवत बाबासाहेब मुंडे (रा. भोपला), गंगाधर शंकर फड (रा. धर्मापुरी), बिभीषण सुधाकर भालेकर (रा. अंबाजोगाई), नवनाथ वैजनाथ फड (रा. धर्मापुरी), शेख निजाम शेख दगडू (रा. अंबाजोगाई), राहुल सुभाष मुंडे (रा. परळी), अमोल लक्ष्मण पौळे (रा. अंबाजोगाई), दत्तात्रय वामनराव दुंदुले (रा. परळी), नामदेव नागनाथ बदने (रा. परळी), चंद्रकांत रामराजा राऊत (रा. अंबाजोगाई) आणि दिनेश करपे (रा. अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची कारवाई
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गट्टुवार, पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलीस उपनिरीक्षक राठोड तसेच अंबाजोगाई उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड करीत आहेत.
परळी शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, शहरातील बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
