कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राचा दुर्मिळ योग; महिलांसाठी वर्षभरातील दर्शनाची एकमेव पर्वणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी आनंदाची बातमी असून, श्री कार्तिक स्वामी दर्शनाचा पर्वकाळ योग यावर्षी मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांचा एकत्रित योग जुळून येत असल्याने या दिवशी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यास विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून ३ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत हा पर्वकाळ योग असणार आहे. या पवित्र पर्वकाळात श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे भाविकांसाठी अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेष म्हणजे, महिलांसाठी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची वर्षभरातील ही एकमेव पर्वणी असल्याने या दर्शनाला विशेष महत्त्व आहे.
बीड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात विहिरीमध्ये तसेच पाण्याखाली असलेले श्री कार्तिक स्वामींचे हे एकमेव जागृत देवस्थान असल्याची धार्मिक श्रद्धा भाविकांमध्ये आहे. अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ येथील देवळा हनुमान मंदिर परिसरात असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात हा दर्शन सोहळा पार पडणार आहे.
या पर्वकाळाचे औचित्य साधून अंबाजोगाई शहरासह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भाविकांनी या पवित्र पर्वकाळात दर्शनासाठी उपस्थित राहून श्री कार्तिक स्वामींचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
