नागरिकांनी महाशिबिराचा लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. अतुल शिंदे यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई शहरातील नागरिकांसाठी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मधुमेहावरील महाशिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. हे शिबिर योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे संपन्न होणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. अतुल शिंदे यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आयएमए, ॲम्मपा आणि योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जागतिक मधुमेह दिनानिमित्त अंबानगरीतील नागरिकांसाठी या विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही नागरिकांना मोफत आरोग्य तपासण्या तसेच मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये मधुमेहासह रक्तदाब, थायरॉईड, हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनी तसेच वयाची ४० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे. वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास मधुमेहासह विविध आजारांचे निदान होऊन त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अतुल शिंदे यांनी केले आहे.
शिबिरात होणार विविध महत्त्वपूर्ण मोफत तपासण्या
या महाशिबिरात रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, तीन महिन्यांची साखरेची सरासरी (HbA1c), किडनी तपासणी, रक्तातील चरबीचे प्रमाण, शरीरातील चरबीचे प्रमाण, पायांच्या नसांची तपासणी, ईसीजी, थायरॉईड तपासणी आणि युरिक ॲसिड अशा विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार हे मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अंबाजोगाई व परिसरातील नागरिकांनी या महाशिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
